माहिती संकलन व लेखन- श्री. शांताराम सखाराम कोटकर

गाव- शिपोशी, (रा. कळवा (प.) जि.ठाणे)

मोबाईल- ९७०२९१३६३३

Website प्रसिद्धी– श्री. संकेतआठल्ये

(www.harihareshwardevasthanshiposhi.in )

 

(सदरचा लेख दि. 6 ऑक्टोबर २०१३ रोजीच्या दैनिक प्रहार मधील कोलाज पुरवणी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.)

 

कर्तृत्ववान लोकांचे निसर्गरम्य गाव शिपोशी

नररत्नांचे तसेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिपोशी हा आमचा खेडेगाव अगदी पेशवाईपूर्व काळापासून विद्वत्ता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ह्या बाबतीत पुढारलेला म्हणून लांजा तालुक्यामध्ये ओळखला जातो. शिपोशी गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसले असून, गावच्या मधून नागमोडी वळणाने वाहणारी ती नदी, तिच्या दोन्ही बाजूला वसलेली लोकवस्ती गावाच्या एका बाजूने जाणारा वळणदार दाभोळे-लांजा रस्ता ,गावाच्या सभोवार असलेली ती डोंगरांची रांग, त्या डोंगरामध्ये उंच सखल भागात असलेले हे ११-१२ वाड्याचे निसर्गसुंदर गाव, एखाद्या उंच डोंगरमाथ्यावरून पहिले असता, चिमुकली दिसणारी ती तांबडया रंगाची घरे त्या कौलारू छपरातून बाहेर पडणारा तो धूर. पावसाळ्यात तर डोंगरकड्यावरून कोसळणारे धबधबे, जागोजागी खळाळत वाहाते नाले-ओहोळ, तुडुंब भरून वाहणारी ती नदी , छोटे – छोटे हिरवेगार शेतमळे त्या हिरव्यागार वनराईने नटलेला हा सृष्टीप्रदेश ते सहज सुंदर निसर्गसौदर्य मनाला भुरळ पाडते. प्रत्येक ऋतूत निसर्गाच्या बदलणा-या त्या रंगछटा येथे पहायला मिळतात .

या निसर्गरम्य गावात प्रवेश होतो तो श्री देव गांगेश्वर याच्या दर्शनाने गावच्या मध्यभागी असलेला या देवालयाच्या समोरच्या बाजूला ईशान्येस पूर्वकाळी एक मोठा तलाव होता . हा तलाव फार वर्षापासून बुजवून येथे भात-जमीन तयार करण्यात आली या भात-जमीन ठिकाणास तळे असे नाव आहे. या तलावाच्या पाण्यावर पूर्वी घाटावरून सामान घेऊन येणा-या बैलांचे तांडेच्या तांडे उतरत असत त्याचप्रमाणे सैनिकांचे तळही येथे पडत असत. सुमारे शंभर वर्षापूर्वी या शेताची दुरुस्ती करण्याकरिता शेत खणीत असताना तलावाशेजारी पक्क्या विटांनी बंधीलेला चौथा-याचा काही भाग पाहण्यात आला होता . वरील एकंदर वर्णनावरून प्राचीनकाळी शिपोशी हा मोठ मोठ्या लोकांच्या वस्तीचा व भरभराटीचा गाव असावा. असे जाणकार लोकांचे मत आहे. त्यावरून शिपोशी हे गाव तेराव्या किंवा चौदाव्या शतका दरम्यान वसले असावे. त्यावेळी कोकणातील वसाहती व गावे रजपूत-मराठा लोकांनी वसवलेली आहेत. (कोकणातील वसाहती लेखक- वि. का. राजवाडे) म्हणजे शिपोशी हे गाव कोणी मराठा सरदाराने वसविले असावे असे वाटते.

गावाला शिपोशी या नावाची व्युत्पत्ती कशी झाली.हे माहित नाही काही जणांचे म्हणणे असे की प्राचीन काळी श्रीपोशी असे नाव रूढ असावे त्या नावाचा सुलभपणे उच्चार करता यावा म्हणून ब-याच काळानंतर त्यातील रकारचा उच्चार सोडून देण्यात आला असावा व सुलभपणे उच्चार करता येणारे शिपोशी हे नाव रूढ झाले असावे पण या बाबतीत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही तेव्हा आपण एव्हडेच म्हणू शकतो. शिवकृपेने ज्या गावाचे पालन पोषण होत आहे तो गाव शिपोशी

सन १६८२ मध्ये शिपोशी गावात काही लोकांची वस्ती होती.असा इतिहास लिखाणात उल्लेख आढळतो पण छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर (१६८९) कोकण भागात जी धामधूम झाली त्यावेळी अनेक गाव जाळून पोळून अगदी उजाड करण्यात आली त्यात शिपोशी गावही सापडला त्यावेळी श्री देव गांगेश्वर मंदिराचे पण नुकसान झाले. काही कालावधी गेल्यानंतर गावक-यांनी त्याच देवस्थानावर मोठ्या श्रद्धेने नवीन भव्य असे देवालय बांधले. त्यावेळी बांधलेल्या देवालयाची एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दुरुस्ती करण्यात आली. पण देवालय आता जीर्ण झाले आहे. हे देवस्थान प्राचीनकालीन असून हे ग्रामदैवत आहे.श्रीचे देवालय भव्य आहे. व परिसर विस्तीर्ण असा आहे. येथे देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरविली जाते. या देवस्थानच्या माध्यमातून विविध करमनुकीचे कार्यक्रम केले जातात श्रीदेव गांगेश्वर देवस्थानचे व्यवस्थापन श्री. केशवराव बाईंग हे ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडतात .

शिपोशी गाव आठल्ये यांना इनाम मिळाल्यानंतर देवळे या गावातून आठल्ये कुटुंबीय सुमारे सन १७२५ मध्ये शिपोशी येथे रहावयास आले आणि सन १७५० च्या दरम्यान श्रीदेव हरिहरेश्वराची स्थापना करून छोटेसे मंदिर बांधले. श्री चे देवालय छोटे असल्यामुळे व जीर्ण झाल्यामुळे इ.स. १८९६ साली नवीन भव्यमंदिर बांधले या मंदिराचा सन १९७० मध्ये जुन्या नव्या बांधकामाचा मिलाफ करून जीर्णोद्धार केलेला असून मंदिर आतून बाहेरून सुबक व सुंदर आहे देवस्थानतर्फे त्रीपुरोत्सव, दरवर्षी ६ दिवस शिस्तबद्ध व मोठ्या रीतीने साजरा केला जातो.उत्सवामध्ये नामवंत व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्याकडून विविध लोकशिक्षणाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात.

इ.सन १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी राजवटीला सुरुवात झाली होती त्या काळापासून महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार झाला होता. पण तो मुंबई पुण्या सारख्या मोठ्या  शहरापुरताच मार्यादित होता. खेडेगावात शिक्षणाचा गंध पण नव्हता. आमचं शिपोशी तर आडवळणावरच खेडेगाव बरेचसे लोक गरीब शेतकरी पण काही सुज्ञ गावक-यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून सन १८५५ साली गावात शाळा सुरु केली .ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील ६ वी मराठी शाळा होती . शाळेला मोठी इमारत पाहिजे हे जाणून कै. जनुकाका हरी आठल्ये (संपादकजगन्मित्र)यांनी पुढाकार घेऊन धनिक लोकांकडून मदत मिळवून गावक-यांच्या सहकार्याने ई.स. १८५९ मध्ये शाळेसाठी एक मोठी व सुंदर अशी गावच्या मध्यभागी इमारत बांधून दिली या शाळेमुळे पंचक्रोशीतील गावच्या मुलांची शिक्षणाची सोय झाली शिपोशी हे या भागातील शिक्षणाचे केंद्र झाले. भविष्यात ही शाळा चांगल्या प्रकारे नावारूपाला आली.

याच शाळेत शिक्षण घेऊन पुढे नावलौकिक झालेल्या ब-याच थोर व्यक्ती आहेत. त्यापैकी इतिहास संशोधक , कै. श्रीकृष्ण उर्फ भय्यासाहेब आठल्ये , सहकार चळवळीचे प्रणेते कै.विष्णूकाका वासुदेव आठल्ये, शिपोशी गावचे माजी पोलीस पाटील कै. महादेवराव दाजीराव बाईंग सा-या मराठेशाहीचा इतिहास लिहिणारे रियासतकार कै. गोविंद सखाराम सरदेसाई (गाव गोविळ) आणि न्या. कै. वैजनाथराव तथा तात्यासाहेब आठल्ये या नामवंताना याच शाळेने शिक्षणाचे बाळकडू दिले याच शाळेत आमच्या जाधव वाडीतील कै. शंकर उर्फ बन्या मास्तर हे आपल्या आठल्ये बंधुसह शाळेत जायचे त्यांच्याच वयाच्या बरोबरीचे माझे काका कै. गोविंद, भिकाजी, शंकर व माझे बाबा कै.सखाराम हे चौघे कोटकर बंधू यांच्या बरोबरीने याच शाळेत जायचे . काका व बाबा परीस्थितीमुळे २-३ इयत्ता एवढेच शिक्षण घेऊ शकले .त्याच बरोबर मी व माझे इतर भाऊ बहिण यांचे १ ली ते ७ वी चे शिक्षण याच शाळेत झाले गावातील गेल्या पाच-सहा पिढ्यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झालेले आहे.१९७७-७८ या शैक्षणिक वर्षापासून ई.५वी ते ई. ७ वी चे वर्ग हायस्कूलला जोडले गेले आता फक्त १ली ते ४थी चे वर्ग येथील शाळेत भरविले जातात

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात मुंबईत उद्योगधंदे वाढत होते. त्यावेळी मुंबईला येण्याजाण्यासाठी फक्त बोटींची सोय होती. पण १८३० च्या नंतर टप्प्याटप्प्याने झालेला मुंबई गोवा हा रस्ता नुकताच झाला होता त्यामुळे कोकणातून बरेच लोक तसेच आमच्या गावचे लोक कामधंदा व शिक्षणासाठी मुंबईला येत होते आता त्यांना आपल्या माणसांना पत्र, पैसे पाठविणे याची निकड भासू लागली होती त्यासाठी गावक-यांच्या प्रयत्नाने १९०५ साली आमच्या शिपोशी गावी पोस्ट ऑफिस सुरु झाले त्याकाळात गावात गरीब शेतक-याला सावकारी कर्ज घेणे भाग पडे घेतलेले कर्ज फेडता न आल्यामुळे शेतक-याची गहाण जमीन, घर सावकार जप्त करी त्यामुळे त्याला जीवन जगणे मुश्किल होई या परिस्थितींचा विचार करून गावक-यांनी कै. विष्णुकाका आठल्ये  यांच्या पुढाकाराने सन १९१३ साली शिपोशी ग्रुप सहकारी पतपेढी स्थापन केली त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशितील शेतक-यांना कर्ज घेण्याची सोय पतपेढीतून झाली व शेतक-यांची सावकारी कर्जातून मुक्तता झाली.

गावात प्राथमिक शिक्षणाची सोय फार वर्षापासून होतीच पण माध्यमिक शिक्षणाची उणीव सर्वांनाच जाणवत होती गावच्या मुलांना रत्नागिरी देवरुख किंवा राजापूरला राहून शिक्षण घ्यावे लागायचे ते सर्व मुलांना शक्य होत नव्हते त्यादृष्टीने विचार होऊन १८ जून १९५९ रोजी कै. डॉ. वि.ग . तथा बापूसाहेब आठल्ये यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी २० विद्यार्थी व ३५ रुपये या भांडवलावर शिपोशी येथे माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली.त्यावेळी ग्रामस्थांनी नाट्यप्रयोग आयोजित करून मिळालेले रुपये ३५१/- व कै. पुंडलिकजी आठल्ये यांनी दिलेली ५०१/- रुपयाची देणगी असे रुपये ८५२/- जमवून शाळेच्या आर्थिक सहाय्याचा शुभारंभ झाला.परंतु शाळेचा खर्च वाढतच होता.

त्यानंतर कै. न्या. वैजनाथ तथा तात्यासाहेब आठल्ये यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शिपोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन होऊन २६ मार्च १९६० रोजी संस्था नोंदविण्यात आली. शाळेला आदर्श विद्यामंदिर असे नाव देण्यात आले शाळेसाठी इमारत बांधण्याचा निर्णय झाला.त्यासाठी कै.डॉ. बापूसाहेब आठल्ये व कै. जगन्नाथ विष्णू आठल्ये यांनी आपली भातजमीन असलेली सुमारे १ एकर ३४ गुंठे जागा संस्थेला विनामुल्य दिली. आता निधी उभारणे कार्यकर्त्यासमोर आव्हान होते.कै.न्या.तात्यासाहेब आठल्ये यांच्या कुशल व समर्थ नेतृत्वाखाली कै. बंडोपंत जोशी कै. डॉ.बापूसाहेब आठल्ये , कै.रघुनाथराव बाईंग , कै.अनंत रा. आठल्ये, कै.भार्गवनाना आठल्ये, कै.प्रफुल्लशेठ भडेकर , कै. गप्पुभाऊ आठल्ये, कै.हिरोजीराव बाईंग ,कै.रघुनाथराव आठल्ये व श्री. शंकरराव बाईंग आणि अनेक  मुंबई व गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने एका वर्षाच्या अवधीत निधी जमा करून पुढे विस्तीर्ण मैदान ,आजूबाजूला झाडी असलेल्या निसर्गसुंदर परिसरात भव्य व देखणी अशी शालागृहाची वास्तू साठ हजार खर्च येऊन तयार झाली त्याचवर्षी शाळा नवीन इमारतीत भरू लागली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच वर्षी मार्च १९६३ च्या शालान्तपरीक्षेचा ९४ टक्के निकाल लागून सुयश लाभले आणि कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न व घेतलेली मेहनत याचे सोने झाले .संस्थेच्या नव्या शालागृहाचे उद्घाटन १९एप्रिल १९६४ रोजी त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शिक्षणमंत्री ना. मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटनाचा समारंभ भव्य व शानदार असा झाला.

या शाळेत आता बाजूच्या कुरचुंब,आडवली,ह्सोळ, तळवडे, बोरीवले, सालपे-केळवली, कोलेवाडी,कोचरी, गोविळ व पालू या गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली.त्यावेळी गावोगाव रस्ते नव्हते. त्यामुळे एस.टी.ची सोय नव्हती. काही मुलांना ३-४ तर काहीना ६-७ किलोमीटर अंतराहून डोंगर-द-यातून, उनपावसातून , नदीनाल्यातून पायपीट करीत यावे लागायचे आम्ही त्याबाबतीत नशीबवान होतो कारण आमच्याच गावात शाळा झाली होती. शाळेलगतच कै. एकनाथ विष्णू आठल्ये यांनी अल्प मोबदल्यात दिलेल्या जागेवर संस्थेने आदर्श विद्यार्थी निवास बांधून दूरवरच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आता बाजूच्या ब-याच गावात रस्त्याची सोय होऊन एस.टी.ची ये जा सुरु असते. त्यामुळे त्या गावच्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाणे सोपे झाले आहे.आमच्या शिपोशी गावात तर फार जुन्या काळापासूनरस्ता आहे. रत्नागिरी – कोल्हापूर  हा रस्ता सन १८८० ते १८९० या कालावधीत टप्प्या टप्प्याने झालेला आहे. वरील सर्व गोष्टींच्या संदर्भावरून निश्चित कालावधी सांगता येत नसला तरी दाभोळहून आमच्या गावातून लांज्याला जाणारा रस्ता विसाव्या शतकाच्या प्रारंभिच्या काळात झाला असावा असे वाटते तेव्हा दाभोळचा पूल नसल्याने उन्हाळी आठ महिनेच वाहतूक चालायची पण १९७७ साली दाभोळच्या नदीवर पूल झाला आणि रात्र दिवस बारमाही वाहतुकीचा हा रस्ता झाला. आता रस्ता डांबरी पण बनला आहे.

सन १९६० ते १९७४ या चौदा वर्षाचे कालावधीत संस्थेला कर्ज झाले होते अशा बिकट प्रसंगी कै. न्या.तात्यासाहेब आठल्ये यांचे सुपुत्र कै. अरुणराव आठल्ये यांनी संस्था कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली हे लक्षात घेता संस्थेने कृतज्ञता म्हणून तसेच कै. तात्यासाहेब आठल्ये यांचे शाळा चालविण्यात असलेले योगदान या असामान्य कार्याचे प्रतिक म्हणून संथेने चालविलेल्या आदर्श विद्यामंदिर या शाळेचे ‘न्या.वैजनाथ विष्णु आठल्ये विद्यामंदिर’ असे नामाभिधान करण्याचे ठरविले व १४ एप्रिल १९७४ रोजी त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना, अनंतराव नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण समारंभ मोठ्या प्रमाणात संपन्न झाला.

शाळेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आता संस्थेचे ज्युनिअर कॉलेज पण झाले होते. नोव्हेंबर १९८४ मध्ये दैनिक लोकसत्ता याचे त्यावेळचे लोकप्रिय संपादक कै.मा. विद्याधर गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत रौप्य महोत्सव समारंभ भव्य व शानदार असा झाला. त्यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै.न्या.तात्यासाहेब व कै. अरुणराव याच्या पुढाकाराने व ओळखीमुळे शाळेच्या व मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या या खेडेगावात  वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती येऊ शकल्या.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, म.म.दत्तो वामन पोतदार,शिवाजीराव भोसले, विद्याधर गोखले, नाथ पै.,बालगंधर्व ,राम मराठे,भीमसेन जोशी,शाहीर साबळे, वसंत देसाई , मास्टर कृष्णराव ,दाजी भाटवडेकर, भालचंद्र पेंढारकर, शंकर घाणेकर, आशा खाडिलकर, शाहीर नानिवडेकर अशी किती नावे घ्यावीत ही यादी फार मोठी होईल.

शाळेच्या पहिल्या शालान्त परीक्षेचा निकाल ९४ टक्के हा कौतुकास्पद असाच होता.त्यानंतर शैक्षणिक प्रगती ग्रामीण भागातील  एकूण सर्वांगीण परिस्थितीचा विचार करता चांगली राहिली असून शिवाय शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबविले जात असतात. संस्थेने २००७ साली श्री बापूजी हरिजी बाईंग महाविद्यालय  चालू केले आहे. आणि कॉलेजकरिता शानदार अशी इमारत बांधली आहे. या कॉलेजमध्ये B.M.S हा पदवी स्तरावरचा अभ्यासक्रम शिकवला जातो.तसेच येथे जापनीज ही परदेशी भाषा शिकण्याची सोय आहे. शाळेच्या स्थापनेपासून श्री.ज.वि.जोशी सर, श्री. म.वा. ठाकुरदेसाई, श्री.अशोक वि.आठल्ये, हे मुख्याध्यापक होते. तर कार्यवाह म्हणून श्री. जगन्नाथ र. उर्फ बाईंग मास्तर हे काम पहात होते.आता मुख्याध्यापक म्हणून श्री. पिसे सर व कॉलेजचे प्रमुख श्री. शेटये सर आहेत.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष न्या.वैजनाथराव विष्णू तथा तात्यासाहेब आठल्ये, त्यांचे  बहुश्रुत व व्यासंगी असलेले व्यक्तिमत्व त्यांच्या कारकीर्दीत संस्थेची उत्तरोत्तर  प्रगतीच झाली. त्यांच्या १९८५ मध्ये झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे कर्तबगार सुपुत्र कै.अरुणराव आठल्ये यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी आली. संगीत, साहित्य , कला यांचा व्यासंग असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व अरुणरावांचे होते. त्यांचे अचानक दु:खद निधन सर्वांनाच चटका लावणारे होते अरुणरावांच्या १९९७ च्या निधनानंतर उच्च शिक्षित श्री. वसंतराव रघुनाथ आठल्ये यांनी संस्थेचे अध्यक्षपद तितक्याच समर्थपणे सांभाळले. व आता त्यांनी वृद्धत्वामुळे तरुण नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविली आहे.

संस्थेला आता प्रसिद्ध उद्योगपती श्री. दिलीप शेठ तुकारामराव बाईंग हे अध्यक्ष लाभले आहेत.तर खाजगी कंपनीत उच्च पदी असलेले श्री. अजय अरुण आठल्ये हे उपाध्यक्ष आहेत. अनुभवी व ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. वामन भार्गव आठल्ये सरचिटणीस पदी आहेत तसेच श्री. अरुण वि. आठल्ये, श्री.श्रीपाद ग. पुजारी ,श्री.मधुसूदन दि. जोशी, श्री. शरद अ. आठल्ये, श्री. श्रीराम शं. कोटकर श्री. सीताराम वि. भालेकर इत्यादी पदाधिकारी व सदस्य आहेत. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी संस्थेला आपणहून दिलेल्या ‘ज्ञानदीप लावूं जगी’ या ब्रीद वाक्याला अनुसरून तळागाळातील वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप उजळण्याच्या हेतूने संस्था गेली पन्नास वर्षे काम करत आहे.

शिपोशी गाव विस्ताराने मोठा असून गावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावात सन १९५६ पासून ग्रामपंचायत असून कै. रघुनाथराव बाईंग यांच्याकडे शिपोशी गावचे पहिले सरपंच  होण्याचा मान जातो. त्यानंतर कै. दत्ताराम धावडेशेठ तसेच कै. भिकाजी उर्फ बाबुराव जाधव हे बराच काळ सरपंचपदी होते. सन २००४ ते २००९ या कालावधीत माझा भाऊ श्री. सुरेश सखाराम  कोटकर याने सलग पाच वर्षे सरपंच पद भूषविले त्याच्या कार्यकाळात त्याने नळ पाणी योजना , लहान लहान रस्ते पायवाट अशी बरीच कामे केली. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या कार्यकाळात शिपोशी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारकडून दिला जाणारा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ मिळाला त्याच्याबरोबर त्यावेळी श्री. अनंत उर्फ बाळ महाडिक हे उपसरपंचपदी होते. आता श्री. चंद्रकांत महीपत दळवी हे सरपंच पदी आहेत.

      गावातील बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय असून येथे मुख्य भाताचे पिक घेतले जाते. मोहोळ प-यावरील धरणामुळे काही लोक उन्हाळ्यामध्ये भाजीपाला व इतर पिके घेत असतात गावचा तरुण वर्ग आता शेती व्यतिरिक्त छोटे छोटे व्यवसाय करू लागला आहे.गावात पूर्वी चौपाखी साधी कौलारू व गवतानी शाकारलेली घरे होती. आता मात्र त्याठिकाणी बरीच घरे चिरेबंदी, दुपाखी तर काही घरे बंगल्याच्या देखण्या रुपात झालेली दिसतात. माझा चुलत भाऊ श्री. वसंत कोटकर याचा चिरेबंदी घरे बांधण्याचा व्यवसाय असून त्याने त्या व्यवसायात चांगले नाव कमावले आहे. गावात बारमाही वाहतुकीची सोय आहेच .त्याव्यतिरिक्त कोकण रेल्वेने पण जाता येते गावात कॉलेजच्या शिक्षणाची सोय झाली आहे. तसेच बँक,पोस्ट ऑफिस,प्राथमिक आरोग्य केंद्र ,दुध डेअरी , पशु प्रथमोपचार केंद्र ,क्रेडीट सहकारी सोसायटी, विजेची सोय तर १९७७ पासून झाली आहे. त्याचबरोबर दूरदर्शन चे कार्यक्रम पाहण्याची सोय पण झाली आहे. वरील सर्व गोष्टीमुळे गावाला आधुनिकतेचा स्पर्श झाला असला तरी देखील हे शिपोशी गाव आपले गावपण टिकवून आहे.

(टीप-वरील लेखातील बरीचशी माहिती  उपलब्ध कागदपत्राच्या आधारे देण्यात आलेली असून अनभिज्ञ पणे काही चुकीची माहिती दिली गेली असल्यास क्षमस्व.)

 

 

************************************************